राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना’ लागू होणार

राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना’ लागू होणार

महाराष्ट्र शासनाकडून शेतकरी आणि ग्रामीण भागाच्या दळणवळणासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून राज्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना’ लागू करण्यात येणार आहे. या योजनेमुळे शेतशिवारातील पांदण रस्त्यांचे सुसूत्र जाळे निर्माण होऊन शेतकऱ्यांना शेतीकामासाठी व वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत पांदण रस्ते तयार करताना रस्त्यासाठी लागणारी मोजणी तसेच पोलिस बंदोबस्ताचे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात आले आहे. यासोबतच गाळ, माती, मुरूम यासाठी कोणतेही स्वामित्व शुल्क आकारले जाणार नाही, असा महत्त्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे.

शेत रस्ते तयार करण्यासाठी १०० टक्के यंत्रसामग्रीचा वापर करण्यात येणार असून त्यामुळे कामाचा वेग आणि गुणवत्ता वाढणार आहे. गाव नकाशातील रस्त्यांवरील अतिक्रमणे तातडीने हटवण्यात येणार असून रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना मनरेगा अंतर्गत वृक्षारोपण करणे बंधनकारक राहणार आहे.

ही योजना महत्त्वाची ठरणार असून ग्रामीण भागातील शेती, वाहतूक, आपत्कालीन सेवा तसेच गाव-शिवार संपर्क अधिक सक्षम होणार आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी कमी होऊन शेती उत्पादन व ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अधिकृत माहिती, शासन निर्णय (GR), अंमलबजावणीची प्रक्रिया व अद्ययावत तपशीलांसाठी नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल्सवर पाहणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

🔗 अधिक माहितीसाठी अधिकृत पोर्टल्स :

(संदर्भ : महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासन)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *