सामाजिक कार्यकर्ते CA शैलेन्द्र मते यांनी भावी नगरसेवकांसमोर मांडले मुद्देसूद, लक्षवेधी प्रस्ताव

सामाजिक कार्यकर्ते CA शैलेन्द्र मते यांनी भावी नगरसेवकांसमोर मांडले मुद्देसूद, लक्षवेधी प्रस्ताव

पुणे | प्रतिनिधी

प्रभाग क्रमांक ३३ मधील नागरी समस्या, वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा आणि भविष्यातील नियोजनाबाबत सामाजिक कार्यकर्ते व चार्टर्ड अकाउंटंट CA शैलेन्द्र मते यांनी भावी नगरसेवक व लोकप्रतिनिधींना उद्देशून महत्त्वपूर्ण आणि दूरदृष्टीपूर्ण मुद्दे मांडले आहेत. हे मुद्दे  व्यवहार्य उपाय आणि विकासाभिमुख दृष्टीकोन मांडणारे असल्याने त्यांची तातडीने दखल घेणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.

रस्ते, पार्किंग व वाहतूक नियोजन

खडकवासला चौपाटी येथील रस्ता अत्यंत अरुंद असून, बाजूचा डोंगर उतार फार उंच नसल्याने १५ ते २० फूट डोंगर कट करून रस्ता रुंदीकरण सहज शक्य असल्याचे मते यांनी स्पष्ट केले. यासोबतच चौपाटी परिसरात योग्य पार्किंग व्यवस्था उभारण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.

नांदेड ते खडकवासला मुख्य रस्त्यावर फूटपाथसाठी मुबलक जागा उपलब्ध असूनही आजतागायत फूटपाथ न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच किरकटवाडी ओढा पूल ते खडकवासला–IAT फाटा या मार्गावर डिव्हायडर बसविल्यास वीकएंडला होणारी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असेही त्यांनी सुचवले.

DP (विकास आराखडा) मध्ये सर्वसमावेशक नियोजनाची गरज

CWPRS, CWPRS कॉलनी, PWD कॉलनी, पाटबंधारे विभागाची जागा तसेच दोन कॅनॉलमधील मोकळी शासकीय जमीन — या सर्व जागांचा DP नियोजनात समावेश करून त्यांचा सार्वजनिक वापरासाठी (उद्यान, शासकीय कार्यालये इ.) विचार व्हावा, अशी ठाम मागणी करण्यात आली.

DP नियोजन करताना अभ्यासू व जागरूक नागरिकांचा सहभाग कसा घेता येईल, यावर प्रशासनाने गंभीरपणे विचार करावा, जेणेकरून हरकती कमी आणि नियोजन अधिक प्रभावी होईल, असे मतही त्यांनी मांडले.

पर्यटन, CSR आणि सुशोभीकरण

खडकवासला धरणामुळे शिवणे रोड व सिंहगड रोडवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. त्यामुळे या संपूर्ण परिसरात CSR अंतर्गत सुशोभीकरण, सौंदर्यीकरण व मूलभूत सुविधा उभारण्याची मोठी संधी असल्याचे मते यांनी नमूद केले.

सुरक्षा व आरोग्य सुविधा

खडकवासला परिसरातील ZP रुग्णालये मनपाकडे हस्तांतरित करून त्यांचे नूतनीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रो आणि भविष्यातील वाहतूक उपाय

खडकवासला ते वडगाव दरम्यान दोन कॅनॉलमध्ये मेट्रो मार्गासाठी मुबलक जागा उपलब्ध असल्याने मेट्रोचे नियोजन तेथून करावे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. सिंहगड रोड पूल फोडून वाहतूक समस्या वाढवू नयेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. जर मेट्रो शक्य नसेल तर त्या जागेवर रस्ता, उद्यान यांसारख्या सार्वजनिक सुविधांचे नियोजन व्हावे आणि ही जमीन खाजगी व्यक्तींना हस्तांतरित होऊ नये, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

विधायक चर्चेचे आवाहन

“समस्या आणि उपाय अनेक आहेत. मात्र येथे केवळ विधायक चर्चा, व्हिजन आणि उपाययोजना यांचीच मांडणी व्हावी. कोणतीही जाहिरात किंवा पक्षीय राजकारण टाळावे,” असे आवाहन करत त्यांनी सर्व उमेदवार व समर्थकांना नम्र विनंती केली आहे.

नागरिकांच्या मते, हे मुद्दे केवळ निवडणुकीपुरते न राहता प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी भावी नगरसेवकांनी प्राधान्याने स्वीकारले पाहिजेत.
अशी ठोस, अभ्यासपूर्ण आणि लोकहिताची मांडणी राजकारणात सकारात्मक बदल घडवू शकते, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *