“पीएचडी करून काय दिवे लावणार?” — हा प्रश्न नाही, ही मानसिकता आहे
“पीएचडी करून काय दिवे लावणार?” — हा प्रश्न नाही, ही मानसिकता आहे
“पीएचडी करून काय दिवे लावणार?” असे विधान आपले राजकीय नेते करतात , त्यांनी कदाचित एका वाक्यात आपली भूमिका मांडली असेल; पण त्या वाक्यामागे दडलेली मानसिकता मात्र अत्यंत गंभीर आहे. हा प्रश्न केवळ एका विद्यार्थ्याचा, एका कुटुंबाचा किंवा एका अभ्यासक्रमाचा नाही—तो ज्ञान, संशोधन आणि लोकशाही मूल्यांबद्दलच्या दृष्टिकोनाचा आहे.
साहेब, थोडं स्पष्ट करूया.
पीएचडीसाठी सरकार थेट पगार देत नाही.
संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती (Stipend) दिली जाते. तीही सहज मिळत नाही.
विद्यार्थ्यांना CSIR, UGC, ICAR यांसारख्या राष्ट्रीय पातळीवरील कठीण परीक्षा उत्तीर्ण कराव्या लागतात.
त्यातून JRF (Junior Research Fellowship) किंवा पुढे SRF मिळते.
याचा अर्थ असा की—
संशोधक आधीच पात्रता सिद्ध करतो
स्पर्धेतून निवडला जातो
ज्ञाननिर्मितीसाठी स्वतःची तरुणाई खर्च करतो
जर एका घरात पाच विद्यार्थी केवळ ज्ञानासाठी, संशोधनासाठी, समाजासाठी पीएचडी करत असतील, तर ते ओझे नाही, तर अभिमानाचे कारण असले पाहिजे. कारण तो घर नव्हे, ती ज्ञाननिर्मितीची प्रयोगशाळा आहे.

खर्च कुठे परवडतो आणि कुठे नाही?
महाराष्ट्र विधानसभेच्या २०२५ च्या हिवाळी अधिवेशनाचा अंदाजित खर्च सुमारे ९० कोटी रुपये होता.
हे अधिवेशन ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत नागपूर येथे पार पडले.
या खर्चात—
-
प्रशासकीय व्यवस्था
-
सुरक्षा
-
सुविधा यांचा समावेश होता.
लोकशाहीसाठी हा खर्च आवश्यकच आहे, मग प्रश्न असा पडतो की,
लोकशाही चालवण्यासाठी ९० कोटी परवडतात , पण ज्ञान निर्माण करणाऱ्या पीएचडीसाठी खर्च नको?
वारसा आणि संधी: दुहेरी मापदंड
आज वास्तव असं आहे की—
-
एखाद्या नेत्याच्या मुलाला
-
पीएचडी पूर्ण करता आली नाही
-
किंवा परदेशात बसूनही काही साध्य करता आलं नाही
तरीही तो सत्तेच्या पायऱ्या सहज चढतो आणि “प्रतिष्ठित नेता” बनतो.
-
मग प्रश्न पडतो—
सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याने ज्ञानाच्या जोरावर वर येऊ नये का?
तो पाच पीएचडी घडवू शकत नाही का?
जर सत्ता वारशाने चालू शकते,
तर ज्ञान मेहनतीने का चालू नये?
“पीएचडी करून काय दिवे लावणार?” हा प्रश्न नाही,
तो संशोधनविरोधी, ज्ञानविरोधी आणि भविष्यविरोधी विचार आहे.
आज ज्या देशांनी प्रगती केली—
-
तिथे संशोधकांचा सन्मान केला
-
ज्ञानावर गुंतवणूक केली
-
प्रश्न विचारणाऱ्या मेंदूंना प्रोत्साहन दिलं
महाराष्ट्राला पुढे जायचं असेल, तर पीएचडी ही खर्चाची बाब नाही, तर भविष्यातील गुंतवणूक आहे—हे मान्य करावं लागेल.
कारण दिवे संशोधकच लावतात— नेते फक्त उद्घाटन करतात.

