खडकवासला वरून धावणार जागतिक सायकलपटू : पुणे ग्रँड टूरचा दुसरा टप्पा

खडकवासला वरून धावणार जागतिक सायकलपटू : पुणे ग्रँड टूरचा दुसरा टप्पा

पुणे ग्रँड टूर २०२६ : खडकवासला मार्गे स्टेज-२ 

पुणे | प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल शर्यती Pune Grand Tour २०२६ मधील दुसरा टप्पा (स्टेज-२) बुधवार, २१ जानेवारी २०२६ रोजी पुणे शहरातून पार पडणार आहे. हा टप्पा पुणे – पुरंदर – राजगड – हवेली असा सुमारे १०५ किलोमीटर लांबीचा असून, खडकवासला मार्गे सायकलस्वार धाव घेणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता कॅम्प येथील लेडीज क्लब येथून या टप्प्याची सुरुवात होणार असून, सायंकाळी सिंहगड रोडवरील नांदेड सिटी परिसरात समाप्ती अपेक्षित आहे. या मार्गावरून जाताना सायकलस्वारांना डोंगराळ घाट, तीव्र चढ-उतार आणि वळणावळणाचे रस्ते यांचा सामना करावा लागणार असल्याने हा टप्पा अत्यंत आव्हानात्मक मानला जात आहे.

पुरंदर आणि राजगड परिसरातून जाणारा हा मार्ग नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा जवळून पाहण्याची मोठी संधी ठरणार आहे. स्पर्धेदरम्यान मार्गावर ठिकठिकाणी प्रेक्षकांची गर्दी होण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या स्पर्धेमुळे काही काळासाठी खडकवासला , सिंहगड रोड व परिसरातील काही रस्त्यांवर वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुणे ग्रँड टूर ही आंतरराष्ट्रीय UCI मान्यताप्राप्त बहु-टप्पा सायकल स्पर्धा असून, देश-विदेशातील नामवंत सायकलपटू यात सहभागी झाले आहेत. या स्पर्धेमुळे पुणे आणि आसपासच्या भागाला जागतिक क्रीडा नकाशावर विशेष ओळख मिळत असल्याचे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

👉 खडाकवसला, सिंहगड रोड आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी या भव्य आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा व या थरारक टूरचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *